अहिल्यानगर - रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांकडून होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, जलसंपदा विभागाने पुढील ४० दिवसांचे नियोजन निश्चित केले आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी श्री. विखे पाटील यांनी तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे पुणे (आंबेगाव, शिरूर, जुन्नर), सोलापूर (करमाळा) व अहिल्यानगर (कर्जत, श्रीगोंदा, पारनेर) या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रब्बी पिकांना या पाण्याचा वेळेत व पुरेसा लाभ व्हावा, यासाठी ४० दिवसांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.
सद्यस्थितीत प्रकल्पात २६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी समन्यायी पद्धतीने करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. पाण्याचा कोणताही अपव्यय न होता, कालव्याच्या शेवटच्या टोकावरील (टेल) गावालाही पाणी मिळावे, अशा सूचनाही श्री.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Post a Comment