नगर – मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेने घेतला इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्याचा बळी


अहिल्यानगर - भरधाव वेगात चुकीच्या दिशेने आलेल्या कर्नाटक राज्य एस टी महामंडळाच्या बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण मयत झाला तर एक जण जखमी झाला आहे. नगर मनमाड महामार्गावर देहरे गावाजवळ २७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३०  च्या सुमारास हा अपघात झाला. रितेश चंद्रकांत खजिनदार (वय १९, रा. देहरे, ता.नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. नगर – मनमाड महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने देहरे व परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.  

मयत रितेश व त्याचा चुलत भाऊ साई रविंद्र खजिनदार हे दोघे दुचाकीवरून मळ्यातून घराकडे जात होते. नगर मनमाड महामार्गावर ते आले असता चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या कर्नाटक राज्य एस टी महामंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघे जखमी झाले. त्यांना नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रितेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. तेथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रितेश याचा २८ डिसेंबर रोजी दुपारी मृत्यू झाला.

मयत रितेश हा देहरे गावचे पोलिस पाटील चंद्रकांत खजिनदार यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, १ बहिण, आजी आजोबा, चुलता, चुलती असा परिवार आहे. या अपघात प्रकरणी एस टी बस चालकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    


 

0/Post a Comment/Comments