नगर - पुणे रोडवरील घाटात पुन्हा लुटमार, निवृत्त शिक्षकाच्या कुटुंबाला मारहाण करत लुटले


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर पुणे महामार्गावर चास (ता.नगर) घाटात पुन्हा एकदा लुटमारीचे सत्र सुरु झाले आहे. कार अचानक बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या निवृत्त शिक्षकासह कुटुंबियांना चौघांच्या टोळीने लाकडी काठ्या, दगडांनी मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी पहाटे १.१५ च्या सुमारास घडली आहे.

याबाबत ईश्वर जिजा पठाडे (वय ५८, रा. वरझडी, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा हा पुणे येथे वास्तव्यास असल्याने ते त्यांची पत्नी, मुलगी, जावई, व २ नातवंडे असे त्यांचे जावई बद्रीनाथ राकडे यांच्या स्कोडा कारने २४ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर हून पुण्याला जाण्यास निघाले होते. २५ डिसेंबर रोजी पहाटे १ च्या सुमारास ते नगर हून पुढे चास घाटात गेले असता त्यांची कार अचानक बंद पडली. त्यांनी कार मधून उतरून काही वाहन चालकांना मदत मागितली, मात्र कोणीही थांबले नाही.

नंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करून कार ओढून नेण्यासाठी टोइंग व्हॅन वाल्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याची वाट पाहत सर्वजण कार मध्ये बसलेले असताना त्यांच्या कार वर अचानक कोणीतरी दगड फेकून मारले. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे जावई हे कार मधून खाली उतरले व दगड कोणी मारले हे पाहत असताना तेथे अचानक ४ अनोळखी इसम आले व त्यांनी त्या दोघांना लाकडी काठ्या व दगडांनी मारायला सुरुवात केली. या मारहाणीत मार लागल्याने फिर्यादी पठाडे हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मदत मागत होते. मात्र एखादे वाहन तेथे थांबण्याचा प्रयत्न करू लागल्यास ते चोघे लुटारू त्या वाहनावर दगड फेकून मारत. त्यामुळे फिर्यादी यांच्या मदतीला कोणी थांबले नाही.

नंतर लुटारूंनी कार मध्ये बसलेल्या फिर्यादीच्या पत्नीच्या कानातील सोन्याचे दागिने ओढून घेतले. त्यावेळी त्यांच्या कानाला मोठी जखम झाली. या लुटारूंनी फिर्यादीचे जावई बद्रीनाथ यांच्या हाताच्या बोटातील अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली. तसेच फिर्यादीच्या पत्नीच्या पर्स मधील २० हजारांची रोकड तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रे असा एकूण ८० हजारांचा ऐवज लुटून नेला. हे सर्व सुरु असताना एक खाजगी आराम बस तेथे थांबली. ते पाहून हे लुटारू अंधारात पसार झाले. काही वेळात टोइंग व्हॅन चालकही तेथे आला. त्याच्या मदतीने फिर्यादी यांनी नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच पोलिस पथकही तेथे आले. त्यानंतर मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना नगरला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

सकाळी पठाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अनोळखी ४ लुटारुंच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ () प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.

चास घाटात ६ महिन्यांपूर्वी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी मारहाण करत लुटण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने १ आणि नगर तालुका पोलिसांनी १ टोळी पकडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही लुटमार बंद झाली होती. परंतु २५ डिसेंबरला पहाटे पुन्हा एकदा अशाच प्रकारे लुटमार करण्यात आली असून तेव्हाप्रमाणेच या वेळीही चौघेच लुटारू होते. त्यामुळे ही टोळी पुन्हा सक्रीय झाली असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी ही घटना घडल्यानंतर सकाळ पर्यंत या परिसरात सर्च ऑपरेशन राबवून लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत.


 

0/Post a Comment/Comments