नगर - पुणे महामार्गावर रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक, लुटारूंनी आणखी एका वाहनचालकाला लुटले


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - पुणे महामार्गावर चास (ता.नगर) गावच्या शिवारात एका वाहनचालकाला लोखंडी गजाचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना २७ डिसेंबर रोजी पहाटे घडली आहे. चास शिवारातील अश्विन पेट्रोल पंपाजवळील सरगम हॉटेलच्या परिसरात ही घटना घडली असून लुटारूंनी १ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून २५ डिसेंबर रोजी पहाटेही एका कुटुंबाला मारहाण करत लुटण्यात आले होते.

याबाबत जितेंद्र रामेश्वर कानडे (वय ४२, रा. हरी साई पार्क, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या वाहनाने २७ डिसेंबर रोजी पहाटे नगर-पुणे रस्त्यावरून प्रवास करत होते. पहाटे १.५० वाजण्याच्या सुमारास चास शिवारात त्यांनी तोंड धुण्यासाठी वाहन थांबवले. ते वाहनातून खाली उतरले व तोंड धुवून पुन्हा वाहनात जाऊन बसत असतानाच दोन अनोळखी चोरटे तिथे आले. त्यांनी त्यांच्या तोंडाला कापड बांधले होते. चोरट्यांनी कानडे यांना लोखंडी गजाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी चोरट्यांनी कानडे यांच्या गळ्यातील सव्वा लाख रूपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन आणि ३० हजार रूपयांचा मोबाईल असा एकूण १ लाख ५५ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

या घटनेमुळे घाबरलेल्या कानडे यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत.दरम्यान, २५ डिसेंबर रोजी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या कुटुंबाला मारहाण करत लुटल्याची घटना चास शिवारात घडली होती. चास परिसर लुटीचे केंद्र बनला असून या ठिकाणी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी चास घाटात लुटीच्या घटना घडत होत्या. मध्यंतरी त्याला आळा बसला होता. मात्र आता पुन्हा लुटमार सुरु झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 

0/Post a Comment/Comments