अहिल्यानगर - नगर कल्याण महामार्गावरील रेल्वेउड्डाणपुलावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिस ठाण्यातील २ पोलिस कर्मचाऱ्यांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी घडली. बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून मारहाण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धरपकड सुरु करत ६ जणांना ताब्यात घेतले होते.
नगर कल्याण महामार्गावरील रेल्वेउड्डाणपुलाखाली ११ डिसेंबर रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह रेल्वेमार्गालगत आढळून आला होता. सदरचा मृतदेह कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने कोतवाली पोलिस घटनास्थळी जावून पंचनामा करत असताना सदर मृतदेह पाहण्यासाठी उड्डाणपुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वाहनचालकांनी पुलावरच त्यांची वाहने उभी केली होती. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
त्याच वेळी पोलिस कर्मचारी भापसे व बर्डे हे एक नोटीस बजावण्यासाठी कल्याण रोडने जात होते. उड्डाणपुलावर एकाने रस्त्यातच गाडी उभी केल्याचे पाहिल्यावर त्यांनी त्या गाडीधारकास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा त्याला राग आला आणि त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या इतर साथीदारांना बोलावून १० ते १२ जणांनी दोघा पोलिसांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. दोघांपैकी एकाला खाजगी रुग्णालयात तर एकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक दिलीप टिपरसे, तोफखान्याचे पो.नि. जगदीश भांबळ, स.पो.नि. गणेश वारुळे यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तोफखाना पोलिस आणि पोलिस उपअधिक्षक यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत ६ जणांना पकडले.

Post a Comment