पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील घोटाळ्यात आणखी ५० लाखांची वाढ



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - सात ते आठ वर्षापूर्वी अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात काही लिपिक व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचा अपहार केला होता. याबाबत आधी विभागीय आयुक्त कार्यालयकडे तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर तपासणीत जून २०२५ मध्ये अकोले तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रात सव्वा तीन कोटी रुपयांची गडबड झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणाचा काही दिवसांपूर्वी जिल्हा लोकलफंड (स्थानिक निधी लेखा) यांनी स्वतंत्रपणे तपासणी केली असून या तपासणीत जिल्हा परिषदेने ठपका ठेवलेल्या रक्कमेपेक्षा ५० लाखांच्या अधिकचा गोंधळ असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात झालेल्या घोटाळ्याची खमंग चर्चा सुरू आहे. या ठिकाणी झालेल्या गैरव्यवहारच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्यावतीने संगमनेर पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी यांच्यासह चौघांचे चौकशी पथक नेमण्यात आले. अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात सात ते आठ वर्षापूर्वी काही लिपकांसह लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतः च्या नावासह काही आरोग्य सेवकांच्या नावे कोटवधी रुपयांचा निधी वर्ग केला होता.

या प्रकरणी आधी विभागीय आयुक्त पातळीवर तक्रार अर्ज पाठवण्यात आला होता. या तक्रार अर्जाची जिल्हापरिषद पातळीवर खातरजमा केल्यावर या ठिकाणी आर्थिक गडबड झाल्याचे समोर आले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तपासणीत सव्वा तीन कोटी रुपयांचा गोंधळ झाल्याचे समोर आले. या प्रकरणी दोषींना नोटीस बजावून गडबड असणारी रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

दरम्यान, जिल्हा परिषदेनंतर आता जिल्हा लोकल फंड (स्थानिक निधी लेखा) यांनी देखील या प्रकरणाची स्वतंत्रपणे तपासणी केली असून यात संबंधीतांकडून वसूल पात्र २ कोटी ८५ लाख रुपये तर संशय अपहार १ कोटी १४ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. यातील संशय रक्कमेची कागदपत्रे संबंधीतांनी उपलब्ध करून दिलेली नाहीत. ही कागदपत्रे उपलब्ध झाल्यास ही रक्कम कमी होणार आहे. अन्यथा संबंधीत रक्कम वसूल पात्र रक्कमेत वाढवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.


 

0/Post a Comment/Comments