अहिल्यानगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी (दि.१२) पुन्हा एकदा नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. या प्रकरणी त्यांनी 'साधू संत झाडावर राहतात काय?' असा सवाल करत आज लोक बोलत नसले तरी एक दिवस येईल आणि ते चीड व्यक्त करत या सरकारला चले जाव म्हणतील. तो दिवस दूर नाही, असा इशारा दिला..
अण्णा हजारे नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी गुरुवारीच या वृक्षतोडीला कडाडून विरोध करत त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांनी या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, साधू संत झाडावर राहतात काय? ते जंगलात राहतात. हे झाडांचे जंगल आहे. तुम्ही झाडे तोडता. ही विसंगती आहे. हे बरोबर नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे. एखाद्याने झाडाची फांदी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुणालाही झाडे तोडू देत नाही. लावतो, पण तोडत नाही.
देशात स्वार्थी लोकांची संख्या वाढली
या देशात स्वार्थी लोक वाढत चाललेत. समाज व देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली आहे. आमच्यासारखे काही लोक आहेत. ते वेळ पडली तर येतील. समाजासाठी आपले बलिदान देतील असा माझा विश्वास आहे. मला ठाम विश्वास आहे की, लोक आज जरी बोलत नसले तरी एक दिवस लोकांचा संताप उफाळून येईल. त्यानंतर लोक चले जाव म्हणतील. हा दिवस फार दूर नाही. लोकांना पटत नसेल तर चले जाव. लोकांच्या हातात आहे. या देशात जनता मालक आहे. तुम्ही सेवक आहात. मंत्री असेल, संत्री असेल, कुणीही असेल तरी तो सेवक आहे. जनता मालक आहे. मालकांना अधिकार आहे. म्हणून मालकांना अधिकार असताना त्यांचे अधिकार तुडवणे बरोबर नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
वृक्षतोडीविरोधात साधू महंतही आक्रमक
दुसरीकडे, तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता साधू महंतही आक्रमक झालेत. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिर, साक्षी गोपाळ मंदिर, शुर्पणखा मंदिर आदीसह अनेक मंदिरांना मनपा प्रशासनाने रस्ते व विकास कामांसाठी नोटीसा बजावल्या आहेत. या प्रकरणी आकांडतांडव झाल्यानंतर प्रशासनाने या नोटीसा चुकून पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळ्याला येणारे साधू संत मंदिरात नव्हे तर कुठे राहणार? एकीकडे बाबरी मशिद तोडून राम मंदिर बनवण्यात आले आणि इकडे मंदिरांना नोटीसा बजावण्यात आल्या. हे राजकारण समजण्यासारखे नाही, असे मत या प्रकरणी महंत राम स्नेहीदास महाराज यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment