आ.विक्रमसिंह पाचपुते विधानसभेत झाले आक्रमक, या विभागाचे काढले वाभाडे, मंत्री झाले हतबल



नागपूर - राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कार्यपद्धतीवर खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एफडीएच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. "अधिवेशन आले की एफडीएला जाग येते आणि कारवाया सुरू होतात, एरवी हा विभाग सुस्त असतो," अशा शब्दांत पाचपुते यांनी विभागाचे कान टोचले. विशेष म्हणजे, मंत्री नरहरी झिरवळ हे देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

सभागृहात बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, "मागील अधिवेशनात मी ‘फेक पनीर’ आणि ‘ॲनालॉग चीज’चा मुद्दा मांडला होता, तेव्हा एफएसएसएआयने (FSSAI) याची गंभीर दखल घेतली होती. मात्र, एफडीएचे अधिकारी केवळ अधिवेशन सुरू असतानाच कारवाया दाखवतात. यंदाच्या अधिवेशनात या विभागाचा प्रश्न नव्हता, त्यामुळे कारवाईही शून्य आहे."

कफ सिरपमुळे नुकतेच 25 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा दाखला देत पाचपुते यांनी महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वेळीच सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच निधीच्या कमतरतेवर बोट ठेवले. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विभागासाठी 200 कोटींची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात हातात केवळ 30 कोटी पडले. निधीशिवाय सुधारणा कशी होणार?" असा सवालही विक्रमसिंह पाचपुते यांनी सभागृहात उपस्थित केला.

90 अधिकाऱ्यांवर राज्याचा डोलारा?

सुधीर मुनगंटीवार यांनीही विभागाच्या प्रशासकीय अनागोंदीवर टीका केली. "शासन गंभीर नाही, शब्द देऊनही पैसे दिले जात नाहीत. बिंदू नामावलीमध्ये (Roster) सुधारणा करण्यासाठी एकही पाऊल उचलले नाही. संपूर्ण राज्याचा कारभार केवळ 90 अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. दुसरीकडे, नवीन अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तरीही त्यांना सेवेत घेतले जात नाही," असे सांगत मुनगंटीवार यांनी सरकारला आरसा दाखवला.

मंत्री नरहरी झिरवाळ हतबल

दरम्यान, आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि सुधीर मुनगंटीवार हे एफडीएच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत असताना, मंत्री नरहरी झिरवळ हे हतबल झाल्याचे दिसून आले. आमदार पाचपुते आणि मुनगंटीवार हे दोघेही एफडीएचे कामकाज थातूरमातूर आणि ढिसाळ असल्याचे स्पष्ट करत असताना, मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएच्या ढिसाळ नियोजनाची कबुली दिल्याचे पाहायला मिळाले.

 


0/Post a Comment/Comments