अहिल्यानगर - बांगलादेशी नागरिकांनी बनावट नावे, पत्ते व कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चार बांगलादेशी नागरिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी २१ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयास पत्र पाठवून चार संशयित बांगलादेशी नागरिकांनी चुकीच्या पध्दतीने भारतीय पासपोर्ट मिळविल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांना दिले होते. चौकशीदरम्यान शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनिल चौधरी या चारही संशयितांनी सन २०१८ मध्ये शेवगाव शहरात सुमारे तीन महिने वास्तव्य करून भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी बनावट पत्ते व कागदपत्रे शासकीय कार्यालयात सादर केल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान या चारही व्यक्तींकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध कागदोपत्री पुरावा अथवा साक्षीदार आढळून आला नाही. या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल २ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांनी अधीक्षक घार्गे यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे संबंधित चार बांगलादेशी नागरिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिध्दार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी व प्रकाश सुनील चौधरी या चौघांनी भारतीय नागरिक असल्याचा बनाव करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार संतोष वाघ यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे.

Post a Comment