बिबट्याच्या हल्ल्यात महीला गंभीर जखमी; थोडक्यात बचावली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण



जामखेड (प्रतिनिधी) - जामखेड तालुक्यातील बावी गावच्या शिवारात १ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात उषाबाई सौदागर चव्हाण (वय ४५) या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी उषाबाई चव्हाण यांची भेट घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा करून उपचारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, कोठारी यांनी परिसरातील ग्रामस्थांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुलांवर विशेष लक्ष ठेवण्यास आणि वन विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बावी आणि फक्राबाद या भागातील पाळीव प्राण्यांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत. सावता राऊत यांच्या तीन बोकडांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वन विभागाकडे बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सावरगाव येथील पोलीस पाटील तुषार चव्हाण यांच्या वस्तीवर काल रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरापासून केवळ ५० ते ६० फूट अंतरावर बांधलेली एक शेळी लांडग्याने अथवा बिबट्याने फाडून नेली. विशेष म्हणजे, या वेळी कसल्याही प्रकारचा आवाज आला नाही.

हनुमान वस्ती येथे गेल्या आठ दिवसांपासून सिंगल फेज लाईट (विजेचा पुरवठा) नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन लांडगा किंवा बिबट्याने शेळीची शिकार केल्याचा अंदाज आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिक वाढले आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची तयारी सुरू केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आणि हल्ल्यांमुळे परिसरात मोठी चिंता व्यक्त होत आहे.

स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये वाढलेली भीती लक्षात घेऊन वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना रात्री एकट्याने फिरणे टाळण्याचा आणि अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



0/Post a Comment/Comments