पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण तयार होत आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात काही गोष्टी पटत नाही अशी चर्चा आहे. पण नाशिकमध्ये या दोघांचेही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या - त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढावे लागते. आज महापालिकेची निवडणूक आहे. त्यात विलिनीकरणाचा विषयअसता तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात युती केली असती. पण असे काही झाले नाही. फक्त पुणे व पिंपरी चिंचवड येथे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
जागावाटप ठरले, पण सांगण्यास नकार
रोहित पवार म्हणाले, शरद पवार या विषयात कुठेच नाहीत. त्यांचे मत एवढेच आहे की, जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या. त्यांचे म्हणणे काय? हे समजून घ्या. महापालिकेत कधीही एवढ्या मोठ्या पातळीवरचे नेते कधीही इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. शरद पवारांना पूर्वीच्या काळची सवय असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार, वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण आपल्याला पहावयास मिळत आहे. पण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ व तुतारी आपल्याला एकत्र लढताना दिसून येतील.
रोहित पवार म्हणाले, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना व घड्याळाचे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देतील. उद्या दुपारी आम्हाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल. आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पण तो माध्यमांना सांगावाच लागेल असे ठरले नाही.
100 पैकी 95 कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची इच्छा
आमच्या 100 पैकी 95 इच्छुक कार्यकर्त्यांनी आम्हाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे व त्यांना निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारणात काही निर्णय लवकर, तर काही निर्णय उशिरा घेतले जातात. राहिला प्रश्न पुणे व पिंपरी चिंचवडचा तर तो काल झाला नाही, तर गत अनेक दिवसांपासून या मुद्यावर चर्चा सुरू होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
शरद पवार गट महायुतीसोबत जाणार का?
पत्रकारांनी यावेळी पुणे महापालिकेत सत्ता आली तर तुम्ही महायुतीसोबत जाणार नाही का? असा प्रश्न यावेळी रोहित पवारांना विचारला. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पुणे महापालिकेचे प्रश्न वेगळे आहेत. पिंपरी चिंचवडचे प्रश्न वेगळे आहेत. महापालिकेची निवडणूक का महत्त्वाची असते, तर तिला स्वतंत्र बजेट असते. त्या बजेटच्या माध्यमातून तेथील जनतेला सेवा द्यायची असते. स्वतःचे बजेट असल्यामुळे आपण राज्य सरकारवर अवलंबून नसतो. त्यामुळे इथे ते बजेट योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी वापरले जावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे लोकल लोकांसाठी आम्ही इथे एकत्र आलोत. त्यामुळे इथे ज्या लोकांची सत्ता लोकली होती, तिथे योग्य पद्धतीचे काम केले गेले नाही असे लोकांचे मत आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Post a Comment