साईबाबांची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेते सुधीर दळवींच्या मदतीला साईबाबाच धावले...



मुंबई - मुंबईतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या चिंताजनक अवस्थेत असून त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. शिर्डी के साईं बाबा, या 1977 मध्ये आलेल्या चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तत्कालीन काळात भक्तांचा अपार विश्वासही बसला. आजही चाहत्यांच्या मनात ते साईबाबाच आहेत. मात्र आता हेच साईबाबा साकारणारे अभिनेते जीवघेण्या संसर्गाशी झुंजत असून त्यांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मागील काही दिवसांत परिस्थितीची गंभीरता समजावून सांगत चाहत्यांना, तसेच चित्रपटसृष्टीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अनेक ठिकाणांहून मदतीचे हात पुढे येत आहेत आणि यामध्ये सर्वांत महत्त्वाची मदत आता शिर्डी साईबाबा संस्थान करणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे. ट्रस्टने ही मदत देण्यासाठी न्यायालयाकडे औपचारिक परवानगी मागितली होती, कारण न्यायालयाच्या मागील आदेशानुसार अशा खर्चासाठी मंजुरी घेणे गरजेचे आहे. न्यायालयाने या मागणीला हिरवा कंदील दाखवत निर्णय दिला. अभिनेत्यांच्या आरोग्यस्थितीचे दस्तऐवज, उपचारांचे बिल, सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने असे म्हणणे स्पष्ट केले की, हे अभिनेते साईबाबांची भूमिका साकारून जनमानसात भक्तीचा संदेश पसरवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अशा व्यक्तीच्या उपचारांसाठी मदत दिली जाणे योग्यच आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना, साईबाबांनी लोकांच्या सेवेसाठी जीवन वेचले होते, त्यांची भूमिका साकारलेल्या कलाकाराला मदत करणे ही मानवतेचीच सेवा असल्याचे नमूद केले.

सध्या सुधीर दळवी मुंबईतील लीलावती रुग्णालयात 8 ऑक्टोबरपासून दाखल आहेत. सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत ढासळली आहे आणि दीर्घकाळ उपचारांची गरज आहे. त्यांच्या पत्नीने सांगितले की, दळवी आता अंथरुणाला खिळले आहेत आणि दोन केअरटेकर व फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जातेय. पूर्ण आरोग्य सुधारण्यास किमान एक वर्षाचा काळ लागू शकतो. कुटुंबाच्या मते, आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. म्हणूनच कुटुंबीयांनी 15 लाख रुपयांची मदत मागणी केली होती. त्यावेळी रिद्धिमा कपूर, अभिनयातील दिग्गज अभिनेता रणबीर कपूर यांची बहीण पुढे आल्या आणि मदतीचा हात दिला. त्यानंतर अनेक चाहत्यांनीही योगदान दिले. तरीही अजूनही उपचारासाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया राबवली गेली.


 

0/Post a Comment/Comments