नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतातील झाडे तोडण्याला विरोध केल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील तिघांवर लोखंडी गज आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा शिवारात ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विश्वनाथ संतू कुमटकर (वय ८०, रा.पिंपळगाव लांडगा, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पिंपळगाव लांडगा शिवारातील गट नं. १६५ मधील घरासमोर फिर्यादी उभे असताना आरोपी झाडे तोडत असल्याचे पाहून त्यांनी विरोध केला. याचा राग मनात धरून आरोपी भानुदास संतु कुमटकर, ज्ञानदेव भानुदास कुमटकर आणि साहेबराव शंकर कुमटकर यांनी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि भावाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी लोखंडी गज आणि कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर गंभीर वार केले.
या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांची पत्नी आणि भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५, ३५१(२) (५), ३५२ सह भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार लोखंडे करत आहेत.

Post a Comment