जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली आगळी वेगळी क्षेत्रभेट



नगर - जिल्हा परिषदेच्या शेटेवाडी (मांडवगण केंद्र, ता.श्रीगोंदा) प्राथमिक शाळेने क्षेत्रभेट उपक्रम अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबविला. एका पारधी समाजाच्या आदिवासी कुटुंबाने फुलवलेली १४ एकर शेती विद्यार्थ्यांना दाखवत त्यातील वर्षभरातील विविध ऋतूत पिकणारी सर्व प्रकारची फळझाडे, पिके दाखवत त्यांची माहिती दिली. ही आधुनिक शेती पाहून विद्यार्थीही आनंदून गेले. 

नगर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर मांडवगण-आंबिलवाडी रस्त्यावर आदिवासी पारधी समाजातील ६६ वर्षीय प्रगतशील शेतकरी सूर्यभान उर्फ टोक्या कुंडलिक काळे यांची १४ एकर शेती आहे. या १४ एकर मध्ये सूर्यभान काळे तसेच त्यांच्या पत्नी व ३ मुले, सुना, नातवंडे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत मोठे परिश्रम घेवून शेती फुलवली आहे. या ठिकाणी नारळाची १५०, आंब्याची ३५०, संत्र्याची ३७५, सागाची ३५० लिंबाची २२५ झाडे लावून त्यांनी बाग तयार केली आहे. 

तसेच वर्षभरात विविध ऋतूत येणारे इतर फळझाडेही लावली आहेत. या शिवाय मका, ऊस, तूर, कांदा, डांगर भोपळा आदी पिकेही आहेत.सर्व शेती ते आधुनिक पद्धतीने करतात, त्यासाठी  सर्व अवजारांसह ट्रॅक्टर ही आहे. शेताला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला जात आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे  जनावरांचा ओपन गोठा असून त्यात ३० गाई आहेत.दररोज २०० लिटर दुध निघते. या शिवाय ५० मेंढ्या ही आहेत. 

शेटेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय कडूस आणि उपक्रमशील शिक्षिका-श्रीम ज्योती भालसिंग यांनी विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत वनभोजनासाठी या क्षेत्राची निवड करत विद्यार्थ्यांना ही आगळी वेगळी क्षेत्रभेट घडवून आणली. काळे कुटुंबाने विद्यार्थांना बागेतील फळे, केळी, आईस्क्रिम, समोसे, पपई ची मेजवानी देत भोजन व्यवस्थाही केली. गप्पागोष्टी, गाणी, प्रश्नमंजुषा,परीसराविषयी माहिती यावेळी देण्यात आल्याने चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  


 

0/Post a Comment/Comments