अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीत विरोधात प्रचार करतो म्हणून २१ वर्षीय तरुणाला मारहाण करत डोक्याला गावठी कट्टा लावून धमकावल्याची घटना ३ जानेवारीला रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. याबाबत यासिर अन्सार सय्यद (रा.दर्गादायरा, मुकुंदनगर) याने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी याची मावशी शेख नसीम खानसाहेब ही निवडणूक लढवत असल्याने फिर्यादी यासिर हा तिचा प्रचार करत आहे. ३ जानेवारीला रात्री ११ च्या सुमारास तो त्याच्या मित्रांसह अलअमिना मैदान मुकुंदनगर येथे थांबलेला असताना त्या ठिकाणी प्रभाग ४ मधील एमआयएम चा उमेदवार आणि माजी नगरसेवक समद वहाब खान, सॅम उर्फ समीर जाफर खान, खालिद दिलदार शेख, सोफियान समद खान, माजीद समद खान, मुजीब उर्फ भुऱ्या अजीज खान, नावेद रशीद शेख हे सर्व जण मोपेड वर आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके होते.
यावेळी समदखान व सॅम याने आमच्या विरोधात प्रचार केला तर वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. तर इतरांनी शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी त्यांना मी तुमच्या विरोधात नाही तर माझ्या मावशीचा प्रचार करत आहे असे म्हणाला असता समदखान याने त्याची गचांडी पकडून तोंडात चापट मारली. त्यावेळी फिर्यादी म्हणाला मला मारू नका नाहीतर पोलिस केस करील. असे म्हणताच सॅम याने कमरेचा गावठी कट्टा काढून फिर्यादीच्या डोक्याला लावला आणि तुला जीवे ठार मारून टाकेल, तुम्ही लय माजले आहात, असे केल्याशिवाय यांची विरोधात प्रचार करायची हिंमत होणार नाही. असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या मित्रांनी त्याला बाजूला घेत या सर्वांच्या तावडीतून सोडवले व आरडाओरडा केल्याने सर्वजण तेथून निघून गेले. असे या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी समद खान सह सर्वांच्या विरुद्ध दंगा, आर्म अॅक्टसह जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment