दुचाकी घसरून झाडावर आदळल्याने भीषण अपघात, पारनेरच्या आरोग्य सेवकाचा मृत्यू



पारनेर – पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद उपकेंद्र येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6) दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र, रुई छत्रपती येथून कार्यालयीन कामासाठी जात असताना पिंपरी गवळी शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

रस्त्यावरून दुचाकी घसरून ते झाडावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच रुई छत्रपती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरे व डॉ. जगताप तसेच इतर सहकारी तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेत असतानाच जाधव यांची प्राणज्योत मालवली.

मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले राम जाधव हे मागील काही दिवसांपासून रांजणगाव मशीद उपकेंद्रात कार्यरत होते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सहकारी, अधिकारी तसेच गावकर्‍यांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने आरोग्य विभागासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



0/Post a Comment/Comments