जामखेड - जामखेड शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील नवीन न्यायालय परिसरातील एका शेतात बाप आणि लेकाने एकाच वेळी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे जामखेड शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानिफनाथ ज्ञानदेव पवार (वय ४५ वर्षे) आणि सचित कानिफनाथ पवार (वय १६ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या बापलेकाची नावे आहेत. हे दोघेही जामखेडमधील आरोळे वस्ती येथील रहिवासी होते. ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला, त्याच कापडाचा वापर करून वडिलांनीही आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयत कानिफनाथ पवार हे आपल्या कुटुंबासह आरोळे वस्तीत राहत होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली होती. घरात पत्नी नसताना बापलेकाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येच्या या घटनेमागील नेमके गूढ शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक महेश निमोनकर यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पाचारण केले. कोठारी आणि त्यांचे सहकारी दीपक भोरे हे रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक संतोष गव्हाळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल देवडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
दोन्ही मृतदेह तातडीने जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ओमासे यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या जामखेड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी सापडली आहे का, किंवा कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. १६ वर्षांच्या मुलासह वडिलांनी केलेल्या या आत्महत्येमुळे नागरिकांमधून सुन्न करणारी प्रतिक्रिया उमटत आहे.

Post a Comment