सिस्पे, ग्रो मोअर व इतर घोटाळेबाजांना सोडणार नाही, नगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरजले



अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यात गोरगरीब गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडविणाऱ्या घोटाळेबाजांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी करु. गोरगरिबांना लुबाडणार्‍या घोटाळेबाजांना पकडून तुरुंगात धाडू, त्यांच्याकडून पै न पै वसूल करु आणि गोरगरिबांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहरात गुरुवारी (दि.८) दुपारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची मार्केटयार्ड जवळील पांजरपोळ मैदानावर सभा झाली. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, आ. विक्रम पाचपुते, आ. मोनिका राजळे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, अशोकराव गायकवाड, अभय आगरकर, सुनिल रामदासी, अक्षय कर्डिले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी 

या सभेत प्रारंभी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात सिस्पे, ग्रो मोअर व इतर कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच या घोटाळेबाजांना राजकीय वरदहस्त असून जिल्ह्यातील त्या पुढाऱ्याने त्यांच्या नेत्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेत हे घोटाळे दडपण्यासाठी प्रयत्न केले असल्याचा आरोप करत नाव न घेता खा.निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला होता. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण सीबीआय कडे देण्याचे सुतोवाच केले.  

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले, नगर शहराला फक्त अहिल्यादेवींचे नाव देवून आम्ही थांबणार नाही तर या शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे काम केले जाणार आहे. केंद्र सरकारकडून भुयारी गटार योजनेसाठी १६४ कोटी, रस्त्यांच्या कामांसाठी १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. याचबरोबर ३५० कोटी रुपयांचा डीपी रस्त्यांचा प्रस्तावही आलेला आहे. हा निधीही लवकरच देण्यात येईल. याशिवाय अहिल्यानगर हे नॅशनल डिफेन्स कॉरीडॉरमध्ये घेण्यात आले आहे. या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पालाही मदत केली जाईल. आम्ही फक्त आश्‍वासने देणारे नाही तर काम करणारे आहोत.असे ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांनंतर प्रथमच शहरांचा विकास सुरु केला आहे. अहिल्यानगर शहराचा सुधारित पाणी योजनेचा ४९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आला आहे. तुम्ही महापालिकेवर भाजप राष्ट्रवादी युतीची एकहाती सत्ता द्या, युतीचा महापौर करा, मी या प्रस्तावास एक महिन्यात मंजुरी देईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केली.  


 

0/Post a Comment/Comments