रांजणगाव - पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांत बंदोबस्ताचे काम देण्याचे अमिष दाखवून ड्रेस किटच्या नावाखाली ३७ मुले व दहा मुलींकडून प्रत्येकी चार हजार रूपये प्रमाणे तब्बल सत्तर हजार रूपये वसूल करणाऱ्या आणि कुठलीही नोकरी न देता उलट या मुला मुलींना शिवीगाळ, दमदाटी करीत धमकावणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
३७ मुले व दहा मुलींना फसविल्याप्रकरणी अवध कलिम बिनसाद (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) व ज्ञानेश्वर महादेव घायतडक (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली असून, अमोल आवटे (रा. श्रीरामपूर) याच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे. तो पसार आहे. फसवणूक झालेल्या व दमदाटीमुळे भयभीत झालेल्या मुलामुलींनी पोलिसांकडे धाव घेत आपली कैफियत मांडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिर्डी येथील तरूणाच्या ओळखीने तिघेजण मंगळवारी (ता. ३० डिसेंबर) रात्री दहा च्या सुमारास रांजणगाव येथे आले असता धायतडक याने त्यांना गावातील सुखकर्ता मंगल कार्यालय येथे बोलावले. त्याठिकाणी ३७ मुले व दहा मुली होत्या. माझी एमएसएफ फोर्सची एजन्सी असून, त्यामार्फत कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्ताचे तसेच रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्यात बंदोबस्ताचे काम देतो. राहण्याची सोय व जेवणखानासह आठ तासाच्या कामाचा महिन्याला १६ हजार रूपये पगार दिला जाईल, असे सांगत धायतडक व बिनसाद यांनी या मुला मुलींकडून ड्रेस व किटसाठी म्हणून सत्तर हजार रूपये जमा केले.
बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) व गुरुवारी (ता. १) मंगल कार्यालयात मुक्काम करूनही कुणालाही काम न मिळाल्याने या मुलामुलींनी बिनसाद व घायतडक यांच्याकडे विचारणा केली असता, श्रीरामपूर येथील अमोल आवटे याने आम्हाला या कामासाठी मुले मुली गोळा करण्यास सांगितले असून, ते आल्यानंतर कामाचे बघू असे सांगितल्याने ही मुले मुली हवालदील झाले. काम नसेल तर दिलेले पैसे परत मागितले असता धायतडक व बिनसाद यांनी त्यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा, आम्ही कुणाला घाबरत नाही, असे म्हणत ते निघून गेल्यानंतर या मुलामुलींनी पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेची गंभीर दखल घेत शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार वैभव मोरे व पथकाने तपासाची चक्रे फिरवून धायतडक व बिनसाद यांना ताब्यात घेत अटक केली.
ऐन थंडीच्या काळात मंगल कार्यालयात दोन दिवस उघड्यावर राहावे लागल्याने व अनेकांकडे अंथरूण पांघरून नसल्याने थंडीने गारठून अनेक मुले मुली आजारी पडली. ज्ञानेश्वर धायतडक व अवध बिनसाद यांनी दोन दिवस या मुला-मुलींना रांजणगाव गणपती देवस्थानमध्ये जेवणासाठी पाठवले.

Post a Comment