विहिरीतील पाण्यात बुडून १९ वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू, नगर तालुक्यातील घटना


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील निंबोडी येथील एका १९ वर्षीय विवाहित तरुणीचा पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आली. अंतरा सागर आवारे (रा. निंबोडी, ता.नगर) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतरा आवारे ही सकाळी ९ वाजेपासून घरातून बेपत्ता झाली होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. काही नातेवाईक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मिसिंग ची तक्रार देण्यासाठीही आले होते. दरम्यान गावच्या परिसरात तिचा शोध घेत असलेल्या काहींना दुपारी एका विहिरी जवळ तिच्या चपला दिसल्या. त्यामुळे विहिरीतील पाण्यात तिचा शोध घेण्यात आला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती विहिरीच्या तळाशी बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. तिला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी तातडीने तिचे नातेवाईक मिनीनाथ आवारे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्याला माहिती दिली.

या माहितीवरून कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार येथे भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने निंबोडी गावावर शोककळा पसरली असून, ही आत्महत्या आहे, की अपघात याचा पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. मयत अंतरा आवारे हिच्या पश्चात पती, सासू, सासरे, २ नणंदा असा परिवार आहे.

हे ही वाचा ...

अमेरिकेत हिमवादळामुळे उडाला प्रचंड हाहाकार, जनजीवन विस्कळीत 

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा 

0/Post a Comment/Comments