अहिल्यानगर - नगर तालुक्यातील डोंगरगण शिवारात असलेल्या वांबोरी घाटातील तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आता त्याच्या खुनाचे गूढही उकलले आहे. मयत किरण शिवाजी कवाणे (वय ३२, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) याचा खुन त्याचा धाकटा भाऊ आणि वडिलांनीच केला असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुलीही दिली आहे.
वडील शिवाजी शंकर कवाणे (वय ५५) आणि भाऊ योगेश शिवाजी कवाणे (वय ३०, दोन्ही रा. टाकळीमिया ता. राहुरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वांबोरी घाटात दरी मध्ये १७ फेब्रुवारीला सकाळी ११ च्या सुमारास प्लास्टिकच्या गोणीमध्ये एकाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पो.कॉ. ज्ञानेश्वर तांदळे यांच्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, दिपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांचे पथक करत होते.
या पथकाने जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये मयताचे वर्णनाचा कोणी इसम मिसिंग आहे काय याबाबत माहिती घेतली. पथकास टाकळीमिया (ता. राहुरी) येथील किरण शिवाजी कवाणे हा मिसिंग असुन त्याचे नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीचे आधारे पथकाने १९ फेब्रुवारी रोजी टाकळीमिया याठिकाणी जावुन माहिती घेवुन मयत किरण चे वडील शिवाजी शंकर कवाणे आणि भाऊ योगेश शिवाजी कवाणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे सखोल व बारकाईने विचारपुस करता योगेश कवाणे याने त्याचा मयत भाऊ किरण कवाणे हा नेहमी दारु पिवुन आईवडीलांना मारहाण करत असल्याचे कारणावरुन वडीलांचे मदतीने खुन केल्याची कबुली दिली आहे.
तसेच खुन केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ते स्विफ्ट कार (क्र. एम. एच. ४६ एक्स ७४६०)मध्ये टाकून वांबोरी घाटात आणून दरीत फेकून दिल्याची कबुली दिली. पथकाने गुन्ह्यात वापरलेली कार तपासकामी जप्त केली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे ही वाचा ...
शिवसेना पदाधिकाऱ्याशी घटस्फोटानंतर मराठी अभिनेत्रीने केले दुसरे लग्न

Post a Comment