नगर-मनमाड रोडवर कंटेनरची दोन मोटारसायकलींना धडक; कुस्तीगीर तरुणाचा मृत्यू



कोपरगाव - नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव नजीक असलेल्या साईधाम पाटीजवळ सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने दोन मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात येवला येथील 20 वर्षीय तरुण रोहन रवींद्र पगारे याचा कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्ती खेळून घराकडे परतणार्‍या खेळाडूवर काळाने घाला घातल्याने येवला आणि कोपरगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

येवला येथील रितेश सुनील भुसे (वय 25) हे आपल्या मित्रांसह कान्हेगाव येथे आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास रितेश, शुभम सुकाशे आणि रोहन पगारे हे दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून येवल्याकडे निघाले होते. साईधाम पाटीजवळ आले असता, मागून येणार्‍या भरधाव कंटेनरने (क्र.एचआर 38 डी 0836) दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. या धडकेत रितेश आणि शुभम जखमी झाले, मात्र दुर्दैवाने रोहन पगारे हा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती रोहन याला मृत घोषित केले. नागरिकांनी सतर्कता दाखवत अपघातग्रस्त कंटेनर थांबवून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रितेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी कंटेनर चालक तौफीक खान शेर खान (रा. पिपरसाना, जि. भिंड, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऐन विशीत असलेल्या होतकरू पैलवानाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने पगारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कोपरगाव शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा 

0/Post a Comment/Comments