पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या संशयावरून लोखंडी गजाने मारहाण


नगर तालुका (प्रतिनिधी) - पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती दिल्याच्या संशयावरून एकाला तिघांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात विविध कार्यकारी सोसायटीसमोर १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली. अंबादास महादेव शेळके (वय ४४, रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शेळके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नगर तालुका पोलिसांनी फैय्याज गुलाब सय्यद आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अंबादास शेळके हे गावातील विविध कार्यकारी सोसायटीसमोर आपल्या भावाची वाट पाहत उभे होते. यावेळी आरोपी फैय्याज सय्यद तिथे आला आणि "तू पोलिसांना आमच्या खबऱ्या देतो का? कालच माझ्या बिंगोच्या दुकानावर पोलिसांनी रेड टाकली," असे म्हणून शिवीगाळ करू लागला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने दुकानात नेले. तिथे फैय्याजने फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्यांनी प्रहार केला, तर त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपीने लोखंडी गजाचा वापर करून शेळके यांच्या पाठीवर वार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल जमिनीवर फेकून त्यावर पाय देऊन काच फोडून नुकसान केले. "पुन्हा पोलिसांना माहिती दिली तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर अंबादास शेळके यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments