नगर - कल्याण रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


अहिल्यानगर - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावर नेप्ती शिवारात घडली आहे. सागर धोंडीभाऊ केदार (रा.निमगाव वाघा, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत मयताचे चुलत भाऊ गुलाब विठ्ठल केदार (रा.निमगाव वाघा, ता.नगर) यांनी २ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. निमगाव वाघा येथील रहिवासी सागर केदार हे ३१ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १६ सीबी८६३०) प्रवास करत होते. रात्री पावणेआठच्या सुमारास नेप्ती शिवारातील सागर भेळ सेंटरजवळ आले असता, मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सागर यांचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर अज्ञात चालक जखमीला मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता वाहन घेऊन पसार झाला.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदीश जंबे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments