अहिल्यानगर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चाहुराणा बुद्रुक येथील नवनिर्मित तालुका विकास अधिकारी कार्यालयाच्या इमारतीत लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले सभागृहाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, व्हाईस चेअरमन माधव कानवडे, संचालक अंबादास पिसाळ, गीतांजली शेळके, अक्षय कर्डिले, माजी आमदार तथा बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ आदींसह सर्व संचालक, नगर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातून आलेले स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे चाहते उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले म्हणाले, स्वर्गीय कर्डिले यांच्या पुढाकारातून या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यांचे सतत या कामावर बारकाईने लक्ष होते. स्वर्गीय कर्डिले यांनी प्रदीर्घकाळ जिल्हा बँकेचे संचालक तसेच अध्यक्ष म्हणून धडाडीने काम केले. बचत गटाच्या महिला, सर्वसामान्य शेतकरी यांना पतपुरवठा करीत सक्षम करण्यावर त्यांचा नेहमीच प्राधान्यक्रम राहिला.
जिल्हा बँकेची ओळख 'शेतकऱ्यांची बँक' अशी व्हावी, या भावनेतून त्यांनी काम केले. त्यांचे अकाली निधन झाले. त्यांची उणीव सदैव भासत राहील. स्वर्गीय कर्डिले यांच्या निधनानंतर माझ्यासह कर्डिले परिवारातील सर्व सदस्यांना पालकमंत्री विखे पाटील तसेच राज्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी दिलेला धीर मोलाचा आहे. कर्डिले यांच्या विचाराचा वारसा आणि कामाची प्रेरणा बाळगून पुढे जाऊ. अशी भावना अक्षय कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा ...
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment