अहिल्यानगर - राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया आता ‘जैसे थे’ थांबल्या होत्या, तेथूनच तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले असून, यामुळे राज्यातील हजारो सहकारी संस्थांमध्ये आता निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत.
राज्य शासनाने ५ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित केल्या होत्या. केवळ उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांच्या निवडणुका यातून वगळण्यात आल्या होत्या. मात्र, नुकत्याच १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या होत्या, त्या त्याच टप्प्यापासून पुढे सुरू कराव्यात.
अ आणि ब वर्गातील ज्या संस्थांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जिल्हा किंवा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठवायचा आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. विशेष म्हणजे, संघीय संस्थांच्या निवडणुकांसाठी ज्या सभासद संस्थांनी आधीच आपले प्रतिनिधी ठराव सादर केले आहेत, त्यांना पुन्हा नवीन ठराव देण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच अ, ब, क, ड वर्गातील ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे किंवा लवकरच संपणार आहे. त्यांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरु करण्यात यावा असेही या आदेशात म्हंटले आहे.
जिल्हा सहकारी बँकेसह सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ फेब्रुवारी मध्येच संपत आहे. या शिवाय जिल्ह्यातील काही सेवा सोसायट्यांचा कार्यकाळ २०२५ मध्ये संपला असून काही सोसायट्यांचा मार्च २०२६ अखेरीस संपणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका ऐन उन्हाळ्यात होणार आहेत.
जिल्हा सहकारी बँकेची मागील निवडणूक २० फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली होती बँकेच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित ४ जागांसाठी मतदान झाले. सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत तर बिगरशेती संस्था मतदार संघात एक अशा ४ जागांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. माजी मंत्री स्व. शिवाजीराव कर्डीले नगर सेवा सोसायटी मतदार संघातून उभे होते. त्यांच्या विरुद्ध महाविकासआघाडीच्या सत्यभामाबाई बेरड यांनी निवडणूक लढविली होती.
पारनेर सोसायटी मतदार संघात स्व.उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले यांच्यात लढत झाली होती.. कर्जतमध्ये तिरंगी लढत झाली. तर बिगरशेती मतदार संघात संचालक दत्ता पानसरे विरुद्ध प्रशांत गायकवाड अशी दुरंगी लढत झाली होती.
हे ही वाचा ...
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा
पंतप्रधान मोदींचा ९ वर्षांनंतर इस्रायल दौरा: संसदेला संबोधित करतील

Post a Comment