टोलनाक्यावर चालकाचे हात पाय बांधुन ट्रकमधील गव्हाचे पोते लुटणारी टोळी पकडली


अहिल्यानगर - मध्यप्रदेश येथून गहू घेवून सोलापूर कडे जाणाऱ्या ट्रकचालकाला नगरमनमाड रोडवरील देहरे टोलनाक्याजवळ अडवून त्याचे हातपाय बांधून ट्रक मधील ९ लाख ६७ हजार २०० रुपये किंमतीच्या गव्हाच्या ९५३ गोण्या दुसऱ्या ट्रक मध्ये भरून लुटून नेणाऱ्या ४ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या कडून लुटलेला गहू व मालट्रक असा ३५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लुटीची ही घटना २७ जानेवारीला रात्री ८.३० च्या सुमारास घडली होती. या लुटारूंनी ट्रकचालक जगदीश चतुर्भुज माळी (रा. मंदसौर, मध्यप्रदेश) याला व क्लीनर ला पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात सोडून दिले होते. २८ जानेवारीला माळी याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात ४ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णु भागवत, विजय पवार, दिपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांची ३ वेगवेगळी पथके तयार करून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.

या पथकांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन आरोपीचे गुन्हा करण्याची पध्दत तसेच व्यावसायीक कौशल्याचे आधारे आरोपींची माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा हा अर्जुनसिंग सरदार (रा. कोलारस, जि. शिवपुरी) व त्याचे साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे आरोपींचा मध्यप्रदेश राज्यामध्ये शोध घेत असतांना सदरचे आरोपी हे शिवपुरी मध्यप्रदेश येथुन पुणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करुन सदरची ट्रक (क्र. आर. जे. ११ जी. सी. २७०४) ही अरणगांव परिसरामध्ये ताब्यात घेतली.

सदर ट्रकमध्ये अर्जुनसिंग नारायणसिंग सरदार (वय ४१), सागरसिंग गुरजंदसिंग सरदार (वय ४४, दोघे रा. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) हे मिळून आले. त्यांच्याकडे सखोल व बारकाईने चौकशी केल्यावर त्यांनी साथीदार कल्ला शब्बीरा कोहरी (वय २५, रा. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश), रतीलाम मदनलाल कोहरी (वय ४०, रा. सबालगड, जि. मुरैना, मध्यप्रदेश) यांचेसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे.

आरोपींनी चोरी केलेला गहु विकण्याचे दृष्टीने दुसरे प्लॅस्टीक बारदाना खरेदी करुन चोरीचा गहु सदर बारदानामध्ये भरलेला असुन आरोपींकडुन एकुण १० लाख ४० हजार रुपये किमतीचा ४७५ गोण्यामध्ये भरलेला एकुण २६ टन गहु, २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकुण ३५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments