नगर तालुका (प्रतिनिधी) - जिल्हाभरात चोरीच्या घटनांनी शेतकरी धास्तावले असतानाच, आता चोरट्यांनी थेट फळबागांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. नगर तालुक्यातील दशमीगव्हाण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या बागेतील तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीची संत्री आणि प्लॅस्टिक कॅरेट लंपास केले आहेत. पोलिसांनी या चोरट्याचा तातडीने शोध घेत त्याला चोरलेल्या संत्र्यांसह शेंडी (ता.नगर) परिसरात पकडले आहे. इरफान बाबा शेख (रा. निंबोडी, ता.नगर, हल्ली रा. मुकुंदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत उक्कडगाव येथील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची दशमीगव्हाण शिवारात गट क्रमांक १४३ (१) मध्ये संत्रा बाग आहे. १९ फेब्रुवारीच्या रात्री ९ ते २० फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या बागेवर डल्ला मारला. चोरट्यांनी झाडावर असलेली १५०० किलो संत्री, ज्याची किंमत साधारण ८० रुपये प्रति किलोप्रमाणे १ लाख २० हजार रुपये आहे, ती चोरून नेली. एवढेच नव्हे तर, संत्री भरण्यासाठी लागणारे ४ हजार ९०० रुपये किमतीचे ९८ प्लॅस्टिक कॅरेट देखील चोरटे सोबत घेऊन गेले.
२० फेब्रुवारीला सकाळी म्हस्के हे बागेत संत्रा तोडण्यासाठी गेले असताना त्यांना ११० पैकी फक्त १२ मोकळे प्लॅस्टिक कॅरेट दिसले तसेच बागेतील झाडांना फळे दिसून आली नाहीत. शेतात त्यांना टेम्पोचे टायर मार्क दिसले. त्यामुळे त्यांची खात्री झाली की कोणीतरी रात्री त्यांच्या बागेतील संत्री तोडून चोरून नेली आहेत. याप्रकरणी शेतकरी पोपट म्हस्के यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या तत्परतेने शेतकऱ्याला मिळाला न्याय
घटनेचे गांभीर्य ओळखून आणि शेतकऱ्याच्या घामाचा दाम त्यांना मिळवून देण्यासाठी नगर तालुक्याचा नव्यानेचे पदभार घेतलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती काढत सदर गुन्हा हा इरफान शेख आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न केले. इरफान शेख याचे लोकेशन काढले असता सायंकाळी तो चोरलेले संत्रे विकण्यासाठी शेंडी परिसरात गेला असल्याची माहिती मिळाली. वारुळे यांनी लगेच पथकाला कारवाई साठी पाठविले. पथकाने शेंडी परिसरात जावून आरोपी इरफान शेख यास चोरलेले संत्रे टेम्पो मध्ये घेवून विक्री साठी जात असताना पकडले. त्याच्या कडून संत्रे व टेम्पो असा ३ लाख २० हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई स.पो.नि. गणेश वारुळे यांच्यासह पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, शैलेश सरोदे, महेश भवार, नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, रघुनाथ कुलांगे, विक्रांत भालसिंग, विकास शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
हे ही वाचा ...
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment