अहिल्यानगरमधील शालेय पोषण आहाराच्या गोडावूनवर हल्ला करत गाड्यांची तोडफोड

 


अहिल्यानगर - कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका माजी सुपरवायझरने पाच ते सहा साथीदारांसह जिल्ह्यात शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या वितरकाच्या गोडाऊनवर हल्ला केला. वितरकाला खंडणीची मागणी करत गोडावून मध्ये उभ्या असलेल्या आहार वाहतूक करणाऱ्या ६ गाड्यांच्या काचा फोडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना १ फेब्रुवारीला रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील जुन्या बोल्हेगाव रोडवरील क्रोनोस फिटनेस च्या पाठीमागे असलेल्या गोडावूनमध्ये घडली. या प्रकरणी दत्ता गोरख सोनवणे (रा. अमरधामच्या पाठीमागे, कल्याणरोड) याच्यासह त्याच्या ५ अनोळखी साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सागर मोहन पाटील (वय ३२, रा. जय मल्हारनगर, नवनागापूर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा प्रतिनिधी असून त्यांचे जुना बोल्हेगाव रोडवर गोडाऊन आहे. जिल्ह्यातील ज्या शाळा अनुदानित आहेत, त्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम ते करतात. त्यासाठी त्यांच्या कडे २२ वाहने आहेत. त्यांच्या कडे या पूर्वी आरोपी दत्ता गोरख सोनवणे हा सुपरवायझर म्हणून कामाला होता. मात्र तो कामात दुर्लक्ष करत, वाहनचालक व गोडावून मधील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असे, विनाकारण कोणालाही पैसे मागत असे त्यामुळे फिर्यादी पाटील यांनी त्यास कामातील हलगर्जीपणामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये कामावरून काढले होते. तेव्हापासून तो पाटील यांना भेटून अथवा फोन करून तुला व्यवसाय करायचा असेल तर मला १ लाख रुपये दे नाहीतर तुला जीवे मारून टाकील अशी धमकी देऊन खंडणी मागत होता. भीतीपोटी पाटील यांनी जानेवारी २०२६ मध्ये त्याला ५० हजार रुपये रोख स्वरुपात दिले होते.

मात्र, त्यानंतरही १ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास दत्ता सोनवणे याने पाच अनोळखी साथीदारांसह गोडावूनवर येऊन धुमाकूळ घातला. तेथील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तीन पिकअप, एक मिनी ट्रक आणि दोन टेम्पोची दगडफेक करून मोठी तोडफोड केली. पाटील यांना फोन करून शिवीगाळ करत 'आता माझी दुश्मनी बघ' अशी धमकीही दिली. फिर्यादी पाटील यांनी रात्री गोडावून मध्ये जावून पाहणी केली असता त्यांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. अखेरीस पाटील यांनी तोफखाना पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दत्ता सोनवणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी आणि तोडफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश चव्हाण करत आहेत.

0/Post a Comment/Comments