सासऱ्याचा गळा आवळून खुन, जावई व त्याचा मित्र निघाले मारेकरी; एलसीबी कडून ३ दिवसांत उकल

 


अहिल्यानगर - पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगरात मृतदेह आढळलेल्या वृद्धाच्या खुन प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत उकल करत सासऱ्याचा गळा आवळून खून करणाऱ्या जावयाला त्याच्या मित्रासह जेरबंद केले आहे. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजण्यापूर्वी ढवळपुरी शिवार (ता.पारनेर) येथे रामदास निवृत्ती सोनवणे (वय ५५,रा. निमगाव सावा, ता.जुन्नर, जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फिर्यादी तुळशीराम निवृत्ती सोनवणे (वय ५८,रा. सुलतानपूर,ता.जुन्नर,जि.पुणे) यांनी फिर्याद दिल्यानंतर पारनेर पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम १०३() प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची तात्काळ उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत झाले.पथकात उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दिपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमिझराजा आत्तार, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड व चालक उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता.

घटनास्थळाची पाहणी व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले. तपासा दरम्यान मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय ३४,रा. पारगाव तर्फे आळे,ता.जुन्नर,जि. पुणे) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय ३१, रा.औरंगपूर, ता. जुन्नर,जि.पुणे) यांनी मिळून हा खून केल्याचे निष्पन्न झाले. २५ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी अमित डुकरे याने कबुली दिली की त्याची पत्नी गेल्या एक वर्षापासून नांदत नव्हती. त्यांना सव्वा वर्षांची मुलगी आहे. सासरे वारंवार वाद घालून मुलीला मारून टाकण्याची धमकी देत होते.याच रागातून आरोपींनी रामदास सोनवणे यांना कारमध्ये बसवून ढवळपुरी शिवारात नेले व गळा आवळून खून करून मृतदेह डोंगरात फेकून दिला. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा ...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा

पंतप्रधान मोदींचा ९ वर्षांनंतर इस्रायल दौरा: संसदेला संबोधित करतील 

अमेरिकेत हिमवादळामुळे उडाला प्रचंड हाहाकार, जनजीवन विस्कळीत

0/Post a Comment/Comments