नगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा



अहिल्यानगर - अहिल्यानगर शहरात स्पोकन इंग्लिश च्या क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला विशेष न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशाल लक्ष्मण बारगळ असे या नराधमाचे नाव आहे. 

याबाबतची माहिती अशी की, दि. १८ ऑगस्ट २०१८ रोजी अल्पवयीन पीडिता ही नेहमीप्रमाणे विशाल बारगळ यांच्या स्पोकन इंग्लिश वर्गात गेली होती. आरोपीने इतर विद्यार्थ्यांना वर्ग संपल्याचे सांगून घरी पाठवले आणि पीडितेला “पाठांतर झाले नाही” असे सांगून थांबवले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करण्यात आला. घरी परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३७६ (३), ३७७, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम ३, ४, ७, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास पीएसआय स्वाती देवडकर यांनी केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास नगर शहर विभागाचे तत्कालीन डीवायएसपी संदीप मिटके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना लेखनिक म्हणुन पोलीस हवालदार राजू भालसिंग यांनी सहाय्य केले.
न्यायालयीन सुनावणीत पीडिता, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया जगताप, जन्म नोंदणी अधिकारी व तपासी अधिकारी संदिप मिटके यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल निर्णायक पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अनंत चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय संजय चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल  रेश्मा अडसूळ यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन विशेष न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी आरोपी विशाल लक्ष्मण बारगळ यास भारतीय दंड संहिता कलम ३७६ (३) अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सक्तमजुरी) भारतीय दंड संहिता कलम ३७७ अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सक्तमजुरी) अशी शिक्षा सुनावली.

हे ही वाचा ...

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला हायकोर्टाचा मोठा झटका 

तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा हे नियम! नशीब बदलेल 

0/Post a Comment/Comments