अहिल्यानगर - सर्पमित्र आणि रिलस्टार म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला आकाश मनोहर जाधव (रा. नागरदेवळे, ता. नगर) हा अखेर गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यातून त्याला २४ फेब्रुवारीला रात्री अहिल्यानगरमध्ये आणण्यात आले. २५ फेब्रुवारीला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची (२ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गांजा तस्करीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश जाधव ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा खरेदी करून मध्य प्रदेश व नागपूरमार्गे मालवाहतूक ट्रक आणि रुग्णवाहिकांमधून अहिल्यानगरमध्ये आणत होता. २० जून २०२५ रोजी केडगाव बायपासवर पोलिसांनी छापा टाकत त्याच्या १२ साथीदारांना रंगेहात पकडले होते. मात्र, त्यानंतर जाधव फरार झाला होता. अखेर छत्तीसगडमध्ये तो पोलिसांच्या हाती लागला.
कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आकाश जाधवला छत्तीसगड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काल न्यायालयात हजर करताच त्याची पोलीस कोठडी दोन मार्चपर्यंत मंजूर करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सर्पमित्र या नावाखाली चालणाऱ्या त्याच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. आता या रॅकेटमधील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि आंतरराज्यीय कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. दरम्यान, या प्रकरणातून आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्पमित्र ते गांजा तस्कर
मुळा नागरदेवळे येथील आकाश जाधव सुरुवातीला विषारी साप पकडणारा सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविल्यानंतर त्याने झटपट पैसा कमावण्यासाठी गांजाच्या काळ्या धंद्यात उडी घेतली. ओडिशामधील उत्पादन केंद्रांमधून तो मोठ्या प्रमाणात माल आणत असल्याचे समोर आले आहे.
रुग्णवाहिकेचा वापर करून तस्करी
तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली असून जाधव छत्तीसगडहून गांजा खरेदी करून रुग्णवाहिकेतून तो मध्यप्रदेश व नागपूरमार्गे नगरमध्ये पोहोचवत होता. येथे माल उतरवून जिल्ह्यातील विविध भागात त्याची विक्री केली जात होती. ऑनलाइन पैशांची मोठी देवाणघेवाण झाली आहे. गांजाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार होत होते. या आर्थिक साखळीतील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून जाधवचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुणे शहरातही त्याच्याविरोधात गांजा तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोतोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा ...
प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला हायकोर्टाचा मोठा झटका

Post a Comment