श्रीगोंदा - श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत प्रशासकीय दिरंगाईमुळे जमीनदोस्त झाली आहे. दोन वर्षांपासून धोकादायक असलेल्या इमारतीच्या निर्लेखनाचा (पाडण्याचा) प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित होता. मंजुरी मिळण्यापूर्वीच ही इमारत रात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळा इमारत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे १९९३ साली शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम झाले होते. मात्र, कालांतराने या खोल्या अत्यंत धोकादायक झाल्या होत्या. त्यामुळे दोन वर्षांपासून शाळा मारुती मंदिरात भरत होती. बाबाजी किसन लोखंडे व विठ्ठल किसन लोखंडे यांनी या शाळेसाठी ४ गुंठे जागा बक्षीस दिली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे शाळेची इमारत कोसळल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष लोखंडे, सोमनाथ लोखंडे यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. जर शासनाने तातडीने नवीन खोल्या मंजूर केल्या नाहीत, तर सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन पंचायत समितीत वर्ग भरवतील असा इशारा यावेळी दिला.
गटविकास अधिकारी राणी फराटे, नगरपालिका मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, विस्तार अधिकारी सुनीता वाजे, नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, नगरसेवक शहाजी खेतमाळीस आदींनी या नुकसानीचा आढावा घेतला. एकीकडे शाळा कोसळत असताना दुसरीकडे जबाबदार अधिकाऱ्यांकडे साधी माहिती नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Post a Comment