राज्यसभेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याला मिळणार उमेदवारीची संधी ? बैठकीत झाली चर्चा



मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यातील केवळ १ जागा मविआला जिंकता येईल. त्यामुळे मविआला कोणाला उमेदवारी देणार याबद्दल उत्सुकता आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस किंवा ठाकरेसेनेनं उमेदवार दिल्यास महायुतीकडून सातवा उमेदवार दिला जाऊ शकतो. त्या स्थितीत क्रॉस व्होटिंगचा धोका आहे. दरम्यान राज्यसभेसाठी अहिल्यानगर मधून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संधी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शरद पवार राज्यसभेवर जाण्यासंदर्भात अद्याप तरी जाहीरपणे काहीही बोलले नाहीत. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे आणि त्यांनी ती इच्छा माझ्याकडे बोलून दाखवली होती, असा दावा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांनी पवारांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली. पण त्यांच्याच पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसदेखील या जागेसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कालच उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे. राज्यातील काँग्रेसमधील बहुतांश नेते राज्यसभेची जागा आपल्याकडे राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

शरद पवार यांच्या सोबतच ठाकरेसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. चतुर्वेदी पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरु केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवायच्या विचारात आहे. नुकतीच मुंबईत काँग्रेसची एक बैठक झाली. त्या थोरात यांच्या नावासंदर्भात चर्चा झाली. थोरात नुकतेच दिल्लीला जाऊन आले आहेत. संसदेचं कामकाज कसं चालतं याचा अनुभव त्यांनी नुकताच घेतला.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार पक्षातून सुरु आहे. १९८५ ते २०२४ अशी सलग ३९ वर्षे ते आमदार राहिले आहेत. १९८५ मध्ये ते संगमनेरमधून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर ते सातत्यानं काँग्रेसकडून निवडून आले. २०२४ मध्ये त्यांचा पराभव झाला. नेमस्त, मुत्सद्दी, अजातशत्रू नेते अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी सांभाळलं आहे. महसूलसारखी महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. त्यामुळे थोरात यांना संधी दिल्यास पक्षाला राज्यात फायदा होईल, असं पक्षाला वाटतं.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा काही दिवसांपूर्वीपर्यंत जोरात सुरु होती. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष सत्तेत जाणार होता, हे स्पष्ट झालं. शरद पवार यांना निवडून दिल्यास आणि पुढे विलिनीकरणाचा विषय मार्गी लागल्यास काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नाही, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी संसदेत सातत्यानं सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भाषणं चर्चेत असतात. अदानींच्या मुद्द्यावरुन ते मोदींवर टीका करतात. पण याच मुद्द्यावर पवारांची भूमिका वेगळी असते. ही भाजपच्या जवळपास जाणारी राहिली आहे. त्यामुळे एकमेव जागा असताना तिथे पवारांऐवजी आपला उमेदवार का पाठवू नये, असे प्रश्न काँग्रेसचे नेते खासगीत विचारत आहेत.

हे ही वाचा ...

अमेरिकेत हिमवादळामुळे उडाला प्रचंड हाहाकार, जनजीवन विस्कळीत

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा 

0/Post a Comment/Comments