अहिल्यानगर - राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस घनदाट जंगलात डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र काहीच ठोस माहिती न मिळाल्याने त्यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून विशेष पथक नेमले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान मुलीला नाशिक–सुरत मार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्या भागात शोधमोहीम राबवून मुलीची सुटका केली.
सुटकेनंतर पीडितेच्या जबाबानुसार तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आले होते. या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. या प्रकरणी मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध पॉक्सो तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस गणेश वाघमारे, इफ्तेखार सय्यद, चांद भाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस गणेश वाघमारे आणि इफ्तेखार सय्यद हे करत आहेत.

Post a Comment