छत्रपती
संभाजीनगर : रमाई घरकुल योजनेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा
खळबळजनक आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या
घोटाळ्याची भीषणता इतकी धक्कादायक आहे की, चक्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि कास्ट
सर्टिफिकेट (जातीचे दाखले) तयार करून योजनेचा पैसा लाटण्याचा आरोप इम्तियाज जलील
यांनी केला.
इम्तीयाज जलील यांनी पत्रकार परिषदेत
सादर केलेल्या कागदपत्रांमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यात देवेंद्र फडणवीस
आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने चक्क 'महार' जातीचे दाखले काढण्यात आले आहेत. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे
यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड बनवून त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची
नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. याच नावांनी बनावट आधार कार्ड तयार करून घरकुल
योजनेसाठी अर्ज करण्यात आले आहेत, असा दावा जलील यांनी केला आहे.
भाजप
नेते आणि अधिकाऱ्यांवर थेट निशाणा
शहरातील
काही नेते गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांच्या हक्काचा पैसा लाटत असल्याचा गंभीर
आरोप जलील यांनी केला. मंत्र्यांच्या दबावाखाली महापालिका आयुक्तांनी कोटींच्या
फाईलवर स्वाक्षरी केली असून या घोटाळ्यात काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा
दावा करत जलील यांनी
त्यांच्या फाईल्सची आकडेवारीच जाहीर केली आहे. या प्रकरणी विभागाच्या
विभागप्रमुखावर सही करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आता
थेट न्यायालयात होणार लढा
प्रशासनातील
अधिकारीच यात सामील असल्याने केवळ तक्रारी करून न्याय मिळणार नाही, त्यामुळे मी सर्व सबळ पुरावे घेऊन उच्च
न्यायालयात जाणार असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. २०१० पासून वाटप करण्यात
आलेल्या घरकुलांपैकी हजारो घरकुले प्रत्यक्ष जमिनीवर अस्तित्वातच नसल्याचा दावाही
त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामुळे खऱ्या गरजूंना घरकुल मिळण्याऐवजी दलालांचे खिसे
भरले जात असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,
अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment