अहिल्यानगर - महसूल विभागात कनिष्ठ सहाय्यक पद व इतर नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट आदेश तयार करून तब्बल १२ लाख २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयातील सेवानिवृत्तासह तीन जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नितीन बापुसाहेब पुंड (वय ३९, रा. तरवडी, ता. नेवासा) यांनी २२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, नितीन पुंड यांचे नातेवाईक असलेले गोविंद विश्वनाथ दळवी (रा. नागरदेवळे, ता. नगर, सध्या रा. लोणावळा, पुणे) हे रक्षा मंत्रालयातून सेवानिवृत्त झालेले असून त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये फिर्यादी व त्यांच्या मित्रांना भूकंप पुनर्वसन कंत्राटी कर्मचारी समिती लातूरमार्फत महसूल विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी सौ. सविता अमर आढाव व शाम विश्वंभर लोकरे यांच्या मदतीने मंत्रालयात कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. आरोपींनी विविध कारणांसाठी व नोकरीच्या बहाण्याने फिर्यादीकडून डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आरटीजीएस, फोन पे, गुगल पे आणि रोख स्वरूपात वेळोवेळी १२ लाख २१ हजार ५०० रुपयांची रक्कम उकळली. तसेच संगनमताने सामान्य प्रशासन विभाग व राज्य शासनाचे बनावट स्वाक्षरीचे आणि बारकोड असलेले नियुक्तीचे व वेतनाचे खोटे आदेश व्हॉट्सॲपवर पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
जेव्हा फिर्यादीने हे आदेश संबंधित कार्यालयात दाखवले, तेव्हा ते बनावट व शासनाकडून निर्गमित न झाल्याचे समोर आले. फिर्यादीने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपी गोविंद दळवी याचा मुलगा संतोष दळवी याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी नितीन पुंड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी २२ सप्टेंबर रोजी रात्री फिर्याद दिली. या प्रकरणी गोविंद विश्वनाथ दळवी, शाम विश्वंभर लोकरे आणि सौ. सविता अमर आढाव यांच्याविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.

Post a Comment