अहिल्यानगर - शहर परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जानेवारी रोजी पहाटे रंगेहाथ पकडले. रोहित रघुनाथ बांगर (वय २५, रा. बागडपट्टी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ११ हजार ६१३ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, बागडपट्टी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक तरुण कुरिअरने मागवलेली नशेची औषधे विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून रोहित बांगर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत 'मेफेनटर्माइन सल्फेट' या इंजेक्शनच्या ३७ बाटल्या मिळून आल्या. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास बंदी असतानाही, आरोपी कोणताही परवाना नसताना त्याची विक्री करत होता.
चौकशीदरम्यान आरोपीने ही औषधे दिल्ली येथील सलमान नावाच्या व्यक्तीकडून कुरिअरद्वारे मागवल्याची कबुली दिली. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना आणि इतर ग्राहकांना नशा करण्यासाठी ही विनाबिल इंजेक्शन विकली जात होती. या इंजेक्शनच्या वापरामुळे मानवी आरोग्यास आणि जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश लबडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे, महिला पोलीस अंमदार वंदना मोढवे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment