नगर तालुका (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी कंटेनरच्या धडकेत जेऊर येथील दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रतीक नंदकुमार शिंदे (वय २३ रा. जेऊर, ता.नगर) असे मयताचे नाव आहे.
प्रतीक शिंदे हा ३१ डिसेंबर रोजी दुपारी घोडेगाव येथील कांदा लिलावासाठी जात असताना इमामपूर शिवारातील प्रहार अकॅडमी परिसरात कंटेनरने (क्र. एम.एच.१२ एल.टी. ६८४५) भरधाव वेगात समोर चाललेल्या त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात प्रतीक याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातात मयत झालेला प्रतीक शिंदे हा कुटुंबातील एकुलता एक होता. तसेच त्याच्या वडिलांचे कोरोना काळात अकस्मात निधन झाले होते. प्रतीक शेती करून आपले शिक्षण करत होता. वडिलांच्या निधनानंतर घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती. घोडेगाव येथील मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी पाठवला होता. कांद्याच्या लिलावासाठी प्रतीक घोडेगाव कडे जात असताना छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स. पो. नि. माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी राजेंद्र मुरलीधर शिंदे (वय ५३, रा. जेऊर, ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment