माजी आमदाराच्या कुटुंबावर कोयत्याने हल्ला; चारचाकी वाहनांची तोडफोड
कर्जत - कर्जत शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, त्यांचे पती नंदकुमार भैलुमे आणि मुलगा अजय भैलुमे हे कर्जत येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास कुटुंबीय घरी झोपलेले असताना आरोपींनी घराच्या दरवाजावर जोरजोरात ठोठावत शिवीगाळ सुरू केली.
खिडकीतून पाहिले असता दत्ता बबन भैलुमे, अक्षय बबन भैलुमे, तेजस बबन भैलुमे, भारती बबन भैलुमे (सर्व रा. सिद्धार्थनगर, कर्जत), कार्तिक निलेश गुंड (रा. गुंडवस्ती, कुळधरण रोड), शुभम सुरेश शिरोळे (बुवासाहेब नगर, कर्जत) आणि यशराज राजकुमार आढाव (रा. बारडगाव सुद्रिक) हे हातात कोयते व लाकडी दांडके घेऊन धमकावत असल्याचे दिसून आले. फिर्यादी व त्यांचा मुलगा अजय बाहेर येताच आरोपींनी “तुमच्या मुलाच्या सपोर्टमुळे अनुराग माने उड्या मारतो,” असे म्हणत प्रतिभा भैलुमे यांच्या दिशेने कोयता फेकला.
मात्र त्या वेळी त्यांनी खाली वाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आरोपींनी अजय भैलुमे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेदरम्यान शेजारी व नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. मात्र जाताना आरोपींनी पुन्हा येऊन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांची कोयत्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस करत असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment