सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासू-सासर्‍यांविरूध्द गुन्हा दाखल



अहिल्यानगर - नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (19 जानेवारी) दुपारी घडली आहे. रूकसार नवाज शेख (रा. सरकार चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

दरम्यान, याप्रकरणी मयत रूकसारचे वडिल शेख युसुफ हबीब (वय 57, रा. नागापूर) यांनी बुधवारी (21 जानेवारी) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू आणि सासर्‍यांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नवाज सुलेमान शेख, सासू इन्ताज सुलेमान शेख व सासरे सुलेमान बादशहाभाई शेख (तिघे रा. सरकार चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

रूकसारचा विवाह नवाज शेख याच्याशी झाला होता. विवाहनंतर वर्षभर सर्व काही सुरळीत चालले, मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात झाली. जानेवारी 2024 पासून हा छळ अधिकच वाढला होता. नवीन घरासाठी आणि व्यवसायासाठी पैसे हवे आहेत, असा तगादा लावून संशयित आरोपी तिला वारंवार मारहाण करत असत. या त्रासाबाबत मुलीने माहेरी माहिती दिली होती, तेव्हा नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिची समजूत घातली व तिला पुन्हा सासरी पाठवले होते.

फिर्यादी हे उपचारासाठी पुणे येथे गेले असताना त्यांना मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. सासरच्या लोकांकडून होणारा सततचा जाच आणि पैशांच्या मागणीला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नवाज शेख, इन्ताज शेख आणि सुलेमान शेख यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments