केडगावला बस मध्ये वृद्धेच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या ५ महिलांची टोळी पकडली

 


अहिल्यानगर - केडगाव बस थांब्यावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे अडीच तोळे सोन्याची मोहनमाळ चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच संशयित महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेले ३ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, ताराबाई महादेव शेलार (वय ६५, धंदा गृहिणी, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) या २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास केडगाव येथून पुण्याकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. बस थांब्यावर एसटीबसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी शेलार यांच्या बॅगेची चेन अत्यंत शिताफीने उघडली. बॅगेच्या आतील कप्प्यात ठेवलेली ७८ आणि ८१ मणी असलेली, सुमारे अडीच तोळे वजनाची आणि ३ लाख रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ आरोपींनी चोरली.

चोरीची घटना लक्षात येताच फिर्यादी ताराबाई यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे प्रसंगावधान दाखवत बस चालक आणि वाहकाने बस केडगाव पोलिस चौकी येथे नेली. तेथून कोतवालीचे पो.नि. संभाजीराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. गायकवाड यांनी लगेच महिला पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले व महिला पो.कॉ. पल्लवी रोहकले यांना पोलिस गाडी घेवून केडगावयेथे पाठविले. त्यांनी तत्परतेने केडगाव येथे जावून बस मधील प्रवाशांकडे चौकशी केली.

बस मध्ये प्रवास करणाऱ्या मंजुळा व्यंकटेश मौदा, गिता राजु माँदा, सरीना अशोक मौंदा, भारती शिवा मौंदा आणि लक्ष्मी रामु माँदा (सर्व रा. लासुर रोड, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या पाच महिलांवर संशय आल्याने त्यांना बस मधून उतरवून पोलिस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली ३ लाख रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ काढून दिली. या पाचही महिलांच्या टोळीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरंदले करत आहेत

हे ही वाचा ...

वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 'करो या मरो' ची परिस्थिती

0/Post a Comment/Comments