माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये अहिल्यानगरच्या ३ ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर



अहिल्यानगर -  ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.

या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.

अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. याशिवाय विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती अहिल्यानगर व राहाता, तर जिल्हास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती संगमनेर यांना प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज करण्यात आले. तसेच २०२५-२६ मधील क्षेत्रीय पाहणी व मूल्यांकन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली झाल्यामुळे राज्याच्या व विभागाच्या यादीत जिल्ह्याला ही मोठी संधी मिळाली आहे.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी बक्षीसाच्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढवण्यासाठी व उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी खर्च करावयाची आहे. या ग्रामपंचायतींनी भूमी, वायू, अग्नी, जल व आकाश या घटकांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. भूमी घटकांतर्गत देशी प्रजातींच्या झाडांची लागवड, जुन्या झाडांचे संगोपन, रोपवाटिका निर्मिती, कचरा संकलन व प्रक्रिया, तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. गावे हागणदारीमुक्त करून मॉडेल गावे तयार करण्यात आली. वायू घटकात हवेची गुणवत्ता तपासणी, फटाके बंदी, सायकल ट्रॅकची निर्मिती व विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले. जल घटकांतर्गत पाणी पातळी वाढवणे, जलस्त्रोतांची स्वच्छता, सार्वजनिक इमारतींचे जल लेखापरीक्षण (वॉटर ऑडिट), पर्जन्य जल संधारण व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्यात आली.

अग्नी घटकांतर्गत गावांमध्ये सौर दिवे, एल.ई.डी. पथदिवे लावणे व घरांवर तसेच शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. सार्वजनिक इमारतींचे ऊर्जा लेखापरीक्षण करून विद्युत बचतीवर भर देण्यात आला. आकाश घटकामध्ये अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी माहिती, शिक्षण व संवाद आराखडा तयार करून स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ देऊन पर्यावरण दूत म्हणून सहभागी करून घेण्यात आले. भिंतींवर पंचतत्त्वांची चित्रे काढून जनजागृती करण्यात आली.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना एकूण २० कोटी ६५ लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत. पुढील माझी वसुंधरा अभियान ६.० (२०२५-२६) मध्येही पुरस्कार जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी स्पष्ट केले आहे. हे यश मिळवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नोडल अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा समन्वयक रविंद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर व सरपंचांचे मोठे योगदान लाभले आहे.

हे ही वाचा ...

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? असं असू शकतं टी २० वर्ल्डकपचं समीकरण

पाक सैन्याच्या चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला, ११ सैनिक ठार, भारतावर गंभीर आरोप

0/Post a Comment/Comments