नगरच्या सिव्हील मधील दिव्यांगांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन



अहिल्यानगर - दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी (११ फेब्रुवारी) अचानक कामबंद आंदोलन छेडले. सातत्याने बदनामी केली जात असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी नियमित दिव्यांग तपासणीवर बहिष्कार टाकला. परिणामी जिल्हाभरातून आलेल्या शेकडो दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय झाली. 

जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक या दिवशी रुग्णालयात उपस्थित राहतात. शेवटच्या रुग्णापर्यंत तपासणी केली जाते, असा डॉक्टरांचा दावा आहे. अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तपासणी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. काही सामाजिक संघटनांकडून प्रक्रियेतील त्रुटींचा आरोप करण्यात येत असल्याने वातावरण तापले आहे. 

जिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संदीप कोकरे म्हणाले की, एका सामाजिक संघटनेकडून गेल्या वर्षभरापासून सातत्याने डॉक्टरांची बदनामी केली जात आहे. आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असताना आमचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. आम्हाला अकार्यक्षम ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात आमची प्रतिमा मलिन केली जात आहे. विनाकारण बदनामी थांबावी, यासाठीच आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गरज पडल्यास सामूहिक राजीनाम्यासही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. 

तपासणी अचानक बंद झाल्याची माहिती मिळताच जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांध्ये संभ्राचे वातावरण निर्माण झाले. काहींनी प्रहार दिव्यांग संघटनेशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. अनेकांना दिवसभर प्रतिक्षा करूनही तपासणी न झाल्याने निराश होऊन परत जावे लागले. प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दूरवरून येण्यासाठी प्रवास खर्च, सोबत मदतनीस यांची व्यवस्था करावी लागते. पुन्हा येणे कठीण आहे, अशी भावना काहींनी व्यक्त केली. प्रकरणाची दखल घेत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. डॉक्टरांशी चर्चा करून आलेल्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. 

चर्चेनंतर शंभर टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र इतर दिव्यांगांची तपासणी न झाल्याने अनेकांना पुन्हा येण्याची वेळ आल्याने असंतोष कायम आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. पोकळे यांनी सांगितले. तपासणी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

हे ही वाचा ...

अभिनेत्री म्हणाली...मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही.. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला...'

अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार 

0/Post a Comment/Comments