नगर - पुणे महामार्गावर लुटमारीचा थरार...कोयता गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या


नगर तालुका (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून नगर पुणे महामार्गावर चास शिवारात वाहनचालक, प्रवासी यांना रात्रीच्या वेळी अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या टोळीचा नगर तालुका पोलिसांनी छडा लावला असून या टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. एक जण पसार झालेला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पकडलेल्या आरोपींकडून २२ फेब्रुवारी रोजी पहाटे लुटलेल्या मुद्देमालापैकी ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या टोळीने लुटमारीचे ३ गुन्हे केल्याचे समोर आले आहे. 

तुषार विजय उमाप (वय १९), बुद्धभुषण संतोष आंग्रे (वय २२, दोघे रा.दैठणे गुंजाळ, ता. पारनेर), तेजस लक्ष्मण उगलमुगले (वय १९, रा. मनोरमा कॉलनी, नवनागापुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर) हा पसार झालेला आहे.   

बीड जिल्ह्यातील कोथरुळ (ता. माजलगाव) येथील बाळासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम हे दोघे स्वीफ्ट कारने  (क्र. एमएच १२ युएम २२४८) नगर मार्गे पुणे येथे त्यांचे भावास भेटण्यासाठी जात असताना २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांना शौचास लागल्याने ते कामरगाव शिवारातील हॉटेल गुरुदत्त हॉटेलचे जवळ गाडी रोडचे बाजुला घेवुन थांबले असता तेथे चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेवुन येवुन दोघांच्या गळ्याला लावले. त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे स्विफ्ट गाडीमध्ये बसवुन नगरकडे नेत असताना स्विफ्ट कार व लक्झरीचा अपघात झाला. सदर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांचे १८ हजार रुपये रोख, ५० हजार  रुपये फोन पे मधून ऑनलाईन व ४७ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, चार्जर, जर्कीन असा एकुण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल शस्त्रांचा धाक दाखवुन, मारहाण करुन बळजबरीने चोरुन नेला आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात २३ फेब्रुवारी रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी या लुटारूंचा कसून तपास सुरु केला. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार आणि तपास पथकाने केलेल्या तांत्रिक तपासानुसार हा गुन्हा तुषार विजय उमाप याने त्याच्या साथीदारांच्या समवेत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांची माहिती काढत त्यांना पकडले तर त्यांचा साथीदार भोऱ्या हा पसार झाला. पकडलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी ५ हजार रुपये रोख रक्कम, ५० हजार ऑनलाईन ट्रान्सपर केलेले, वनप्लस कंपनीचा मोबाईल, चार्जर, जर्कीन तसेच आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांपैकी एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कोयता असा एकुण ८९ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लुटमारीच्या ३ गुन्ह्यांची दिली कबुली

तसेच अशा प्रकारचे गुन्हे यापुर्वी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले असुन त्याबाबत आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी २ महिन्यापुर्वी चास घाटामध्ये एका कुटुंबाची गाडी बंद पडलेली असताना त्यांना मारहाण करुन त्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कागदपत्रे बळजबरीने चोरुन नेल्याचे सांगितले. तसेच आरोपी तुषार उमाप याने व त्याचा फरार साथीदार भोऱ्या उर्फ विठ्ठल काळे याने चास शिवारात पेट्रोल पंपाजवळ सरगम हाँटेल जवळ मध्यरात्री तीन इसमांना गजाचा धाक दाखवुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन व त्यांचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेल्याचे सांगितले.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, .फौ.दत्तात्रय हिंगडे, पो.हे.कॉ. नितीन शिंदे, पो.हे.कॉ. सुभाष थोरात, पो.हे.कॉ. मंगेश खरमाळे, पो.कॉ. विक्रांत भालसिंग, मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.

हे ही वाचा ....

प्रसिद्ध मराठी अभिनेता पडला मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात

वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 'करो या मरो' ची परिस्थिती  

0/Post a Comment/Comments