अहिल्यानगर - नगर तालुक्यातील माथणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे आता थेट चंद्रावर जाणार आहेत. नासाच्या आर्टेमिस -२ मोहिमेच्या ओरियन यानासोबत माथनी शाळेच्या नावाचे एस. डी .कार्ड चंद्रावर जाणार आहेत.शाळेतील सव्वीस विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. 'नासा' या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या 'आर्टेमिस-२' मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास 'नासा'कडून देण्यात आले आहे. हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून माथणी शाळेतील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनिल अडसूळ आणि राहुल व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची यशस्वीरित्या नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास पाठवण्यात आले. त्यांना मोहिमेचे प्रक्षेपण व्हर्च्युअल पाहता येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एस .डी. कार्डमध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत.
यामध्ये आरोही घोरपडे, यश कापसे, साई फुलमाळी, दत्ता फुलमाळी, आर्यन फुलमाळी, गणेश परदेशी, विघ्नहर्ता फुलमाळी, भिनक शेख, शंभुराजे घोरपडे, आराध्या धामणे, अंजली वाघ, त्रिशा ठोंबे, मंजुश्री घोरपडे, अनुष्का परदेशी, आदित्य फुलमाळी, शिवम शिंदे, ज्ञानेश्वर परदेशी,कार्तिकी घोरपडे, रुद्रांश शिंदे, विघ्नहर घोरपडे, ईशान गायकवाड, आयाज शेख, प्रभास फुलमाळी, सुरज घोरपडे, हर्षद फुलमाळी,कृष्णा परदेशी या विद्यार्थ्यांचे व शिक्षक सुनिल अडसुळ आणि राहुल व्यवहारे यांच्यासह यावेळी शाळेचा ही बोर्डिंग पास विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आले.
या उपक्रमात शाळेतील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनिल अडसूळ, शिक्षक राहुल व्यवहारे यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते. " विद्यार्थ्यांना या बाल वयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अंतराळवीर यांची माहिती व्हावी, त्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरली जावीत तसेच विदयार्थ्यांची जिज्ञासू वृत्तीला चालना मिळते, वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होईल. या विशेष मोहिमेत आपला सहभाग असल्याची भावना विदयार्थांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे .
"आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावे म्हणून शिक्षकांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. आर्टमिस-२' ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे ६ लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, केंद्रप्रमुख संजय धामणे यांनी माथणी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.
नासा ५४ वर्षांनी चंद्रावर पाठवणार अंतराळवीर
नासा ५४ वर्षांनंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवणार आहे. आर्टेमिस-२ मोहिमेंतर्गत पुढील वर्षी रीड वैसमन, व्हिक्टर ग्लोवर , क्रिस्टिना कोख आणि जेरेमी हंनसन हे ४ अंतराळवीर १० दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत येतील. ही मोहीम भविष्यात पुन्हा चंद्रावर उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालींची तपासणी करण्याचे काम करेल. नासाने म्हटले आहे की, अर्टेमिस २ मानवाला चंद्रावर परत नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाची मोहीम ठरेल.
हे ही वाचा ...
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात भाग्यश्री साकारणार खास व्यक्तीरेखा

Post a Comment