शेतकरी कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात, सहकार मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती



अहिल्यानगर - राज्यातील शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबत शेतकर्‍यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेेणार आहे. राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या या कर्जमाफीसाठी आवश्यकता असल्यास अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. नगरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्टेशन रोड शाखा व मुख्य कार्यालय इमारतीचे नूतनीकरण व ई-लॉबीचे उद्घाटन सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, आ. मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. नरेंद्र घुले, अक्षय कर्डिले, बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब लक्ष्मण वर्पे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सूरवसे आदी उपस्थित होते.

यावेळी सहकार मंत्री पाटील म्हणाले, सहकार चळवळ हा सामाजिक व आर्थिक विकासाचा भक्कम पाया आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योजक व सर्वसामान्य कुटुंबांसाठी आर्थिक आधारस्तंभ आहे. या इमारतीच्या नूतनीकरणातून केवळ भौतिक सुविधा सुधारल्या नसून बँकेच्या कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेग वाढविण्याचा संकल्प साकार झाला आहे. राज्यातील अग्रगण्य बँकांमध्ये अहिल्यानगर येथील या बँकेची गणना केली जाते. सध्या 287 शाखांच्या माध्यमातून बँक लाखो ग्राहकांशी जोडली गेली आहे. शेतकर्‍यांना पीककर्ज, अल्पमुदतीचे कर्ज तसेच विविध आर्थिक सुविधा देत बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देत आहे.

खासगी बँकांच्या बरोबरीने आधुनिकीकरण करून बँकेने जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर घातली आहे. स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेले बँकेच्या उत्कर्षाचे स्वप्न आज साकार होत असून त्यांची उणीव सदैव जाणवत राहील, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज सर्वच क्षेत्रांमध्ये प्रभावी वापर होत असून पारंपरिक शेतीतही बदल घडवून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. तरुणांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेती समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली असून केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून या क्षेत्राला न्याय देण्याचे कार्य सुरू आहे. सहकारी सोसायट्या केवळ कर्जपुरवठ्यापुरत्या मर्यादित न राहता शासनाच्या 51 विविध योजनांचा समावेश करून त्यांना अधिक सक्षम व सर्वसमावेशक बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्याची सहकार परंपरा समृद्ध असून या बँकेने अनेक वर्षे ग्रामीण भागाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. नूतनीकरण झालेली ही इमारत म्हणजे नव्या युगाची सुरुवात असून, ग्राहकाभिमुख सेवा देण्याची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होत आहे.

हे ही वाचा ...

ऐन रमजानमध्ये पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; १७ जणांचा मृत्यू

0/Post a Comment/Comments