श्रीगोंदा - नगर दौंड महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात मंगळवारी (दि.२४) पहाटे झालेल्या मालट्रक आणि मारुती इको कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चालक अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ ट्रक आणि इको कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दौंडकडून नगरकडे येणारा मालट्रक आणि नगरकडून दौंड च्या दिशेने जाणारी मारुती इको गाडी यांच्यात हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, इको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात इको गाडीचा चालक नितीन अनिल कोकाटे (वय २२, रा. काष्टी, ता.श्रीगोंदा) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच गाडीत प्रवास करणारे गजानन जनार्धन पायघन (वय ४७), दुर्गा गजानन पायघन (वय ३६) आणि वैभव गजानन पायघन (वय १९) या आई-वडील व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अपघातात करण गजानन पायघन (वय १३) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पायघन कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुयातील मळतूर येथील रहिवासी असून कामानिमित्त सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. गावाहून चिंभळेकडे परत येत असताना हा भीषण अपघात झाला.
पहाटेची वेळ, विरळ वाहतूक आणि संभाव्य वेग यामुळे हा अपघात अधिक भीषण ठरल्याची चर्चा परिसरात आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बेलवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही करून वाहतुक सुरळीत केली.
या घटनेमुळे नगर - दौंड मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणार्या अपघातांमुळे या मार्गावर वेग नियंत्रण, फलक, प्रकाशव्यवस्था याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मगणी केली जात आहे.
हे ही वाचा ...
प्रसिद्ध मराठी अभिनेता पडला मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात
‘धुरंधर २’ मध्ये दिसणार 'हा' सर्वांत मोठा बदल; १९ मार्चला होणार प्रदर्शित

Post a Comment