शिर्डी - शिर्डीच्या साईबाबांच्या विषयी २ युट्युब चॅनल वर्ब व्हिडीओद्वारे खोटी व बदनामीकारक माहिती पसरवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून या प्रकरणी साई संस्थान च्या फिर्यादी वरून संबंधित युट्युब चॅनल चालविणाऱ्या एका महिलेसह तिघांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात २ मार्च रोजी २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष महादेव गाडीलकर (रा. श्री साईबाबा भक्त निवास, शिर्डी, ता. राहाता) यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, तेलगु भाषेतील युट्युब चॅनल शिवा शक्ती यावर २५ फेब्रुवारी पूर्वी श्री साई बाबा यांच्या विषयी आक्षेपार्ह व खोटी माहिती असलेले व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत. त्याद्वारे साईबाबांची बदनामी करण्यात आली. हे व्हिडीओ तेलगु भाषिक साई भक्त प्रमोद कुमार चंदा व इतरांच्या निदर्शनास आले.
त्यांनी त्या व्हिडीओ तील तेलगु भाषेतील माहितीचा इंग्रजी भाषेत अनुवाद करून व्हिडीओच्या लिंक व तो मजकूर साई संस्थानला पाठविला. तसेच याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. संस्थानने याबाबत तातडीने दखल घेत साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या शिवा शक्ती या तेलगु भाषेतील युट्युब चॅनलची चालक करुणकर सगुणा (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) हिच्या विरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी बीएनएस कलम ३५२, ३५३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद भास्कर किल्ली नावाच्या युट्युब चॅनल चालविणारे भास्कर किल्ली व प्रवीण कुमार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध देण्यात आली आहे. या चॅनल वरील व्हिडीओत एका तरुणीशी संवाद साधताना साईबाबांच्या विषयी चुकीची व बदनामीकारक माहिती देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून दोघा संबंधितांच्या विरुध्द पोलिसांनी बीएनएस कलम ३५२, ३५३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. काही विकृत लोक श्री साईबाबांच्या विषयी वारंवार चुकीची व बदनामीकारक माहिती पसरवत असल्याने साईभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे ही वाचा ...
दुबईहून मुंबईत पोहोचलेल्या प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव
'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा
प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली...'मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...'
भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...

Post a Comment