नगर तालुका (प्रतिनिधी) - जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असताना नगर तालुका पोलिसांनी वाळुंज (ता.नगर) गावाच्या शिवारात कारवाई करीत वाहनासह दोन जनावरे जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेतला असून, दुसरा आरोपी फरार आहे.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विक्रांत विलास भालसिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांना शनिवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली की, अहिल्यानगर-सोलापूर रोडवरून वाळुंज गावाच्या शिवारातून कत्तलीसाठी जनावरे भरून एक वाहन जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी सहाय्यक फौजदार शकिल सय्यद, चालक पोलीस कॉन्स्टेबल शिंदे व फिर्यादी भालसिंग यांना कारवाई साठी पाठविले. पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वाळुंज शिवारात अहिल्यानगर-सोलापूर रोडवर वाहन (क्र. एमएच-१६, सीडी-४४८१) आढळून आले.
या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक काळ्या-पांढर्या रंगाची जर्सी जातीची गाय व एक राखाडी रंगाचा बैल दाटीवाटीने दोरांनी बांधून ठेवलेले दिसून आले. वाहन चालकास विचारणा केली असता त्याने आपले नाव योगेश बाबासाहेब ताकपेरे (वय ३२, रा. हिंगणगाव, ता. जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पुढील चौकशीत ही जनावरे मुदस्सर कदिर कुरेशी (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी नेत असल्याचे त्याने कबूल केले.
त्यानंतर पोलिसांनी अंदाजे १० हजार रुपये किंमतीची जर्सी गाय, २० हजार रुपये किंमतीचा बैल आणि अंदाजे ३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक योगेश बाबासाहेब ताकपेरे याला ताब्यात घेण्यात आले असून मुदस्सर कदिर कुरेशी हा फरार आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा ...
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल?
भारतात असंसर्गजन्य आजारांचे वाढते संकट! काय आहे कारण?
रात्री झोपण्याआधी चावून खा किचनमधील हा हिरवा सुगंधी पदार्थ, होतील अनेक फायदे

Post a Comment